---Advertisement---

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री गडकरींच्या घराला बॉम्बने उडविण्याची धमकी !

By team
On: August 3, 2025 2:57 PM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडविण्याची धमकी रविवारी सकाळी मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली असून, पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांनी तत्काळ पावले उचलत, नितीन गडकरींच्या दोन्ही निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दरम्यान, धमकीचा कॉल फेक कॉल असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली असून, या प्रकरणती एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या नागपूर येथील जयप्रकाशनगर मेट्रो स्थानकाजवळील एन्रिको हाइट्स येथे वास्तव्यास आहेत, तर महाल परिसरातील त्यांच्या जुन्या घराचे नूतनीकरण सुरू आहे. आज एका अज्ञाताने डायल 112 वर कॉल करून नितीन गडकरींचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. माहिती मिळताच राणा प्रतापनगर आणि कोतवाली पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. खबरदारीचा उपाय म्हणून नितीन गडकरी यांच्या दोन्ही ठिकाणच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ करण्यात आली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा फोन फेक कॉल असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही कोणतीही जोखीम पत्करण्यात न येता सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित कॉल करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांच्या घराची सुरक्षा आधीपासूनच चोख आहे, मात्र अशा प्रकारची धमकी मिळाल्यानंतर यामध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. हा प्रकार केवळ खळबळजनक नसून, सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जात आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांकडून या प्रकरणाचा गंभीरतेने तपास केला जात आहे.

पोलिस उपायुक्त (झोन १) ऋषिकेश रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सकाळी 9 वाजता 112 या आपत्कालीन हेल्पलाइनवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा आणि लवकरच स्फोट होणार असल्याचा एक फोन आला. त्यानंतर तात्काळ गडकरी यांच्या सुरक्षा पथकाला माहिती देण्यात आली आणि बॉम्ब शोध पथक सक्रिय करण्यात आले.

संपूर्ण परिसराची कसून तपासणी केल्यानंतर कोणतेही स्फोटक किंवा तत्सम धोकादायक साहित्य आढळले नाही. त्यामुळे हा फोन खोटा असल्याचे स्पष्ट झाले. डीसीपी रेड्डी यांनी या कॉलसंदर्भात एका व्यक्तीला अटक झाल्याचेही स्पष्ट केले. सदर कॉल का करण्यात आला, त्यामागील उद्देश काय होता, याचा तपास सध्या सुरू असल्याचेही पोलिस उपायुक्त यांनी सांगितले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. तो एका स्थानिक दारू दुकानात काम करत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. फोन कॉलसाठी वापरलेल्या क्रमांकाच्या आधारे त्यांची ओळख पटवून ताब्यात घेण्यात आले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!