ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोलिसांची मोठी कारवाई : बीडमधील आठवले गॅंगवर मकोका अंतर्गत गुन्हा !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी उफाळून येत असतांना आता पोलीस दलाने मोठी कारवाई केली आहे. आणखी एका गॅंगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात गोळीबार करणाऱ्या आठवले गॅंगवर पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सनी आठवलेची ही गॅंग असून काही दिवसांपूर्वी पोलिस अधिकारी शितल बल्लाळ यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. याच गॅंगवर आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.

डिसेंबर महिन्यात बीडमध्ये दहशत पसरवणाऱ्या दोन गॅंगवर बीड पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या जवळचा असलेला सुदर्शन घुलेच्या गॅंगवर मकोका लावल्यानंतर आता आठवले गॅंगवर सुद्धा मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईवरून बीड पोलिस अलर्ट मोडवर आली असल्याचे दिसत आहे.
13 डिसेंबर 2024 रोजी पेठ बीड पोलिस ठाणे हद्दीत गोळीबार प्रकरण झाले होते. यात प्रामुख्याने अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांचा समावेश आहे. या आरोपींनी आतापर्यंत 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आता आठवले गँगवर मकोका कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपी सनी आठवलेने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. यात पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि वाल्मीक कराडचे संभाषण असून वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच पोलिस कामकाज करत असल्याचा आरोप सनी आठवलेने केला होता. आता त्याच्यावर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी म्हंटले की, ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडत आहेत. त्या ठिकाणी मकोका प्रस्ताव पाठवला जाणार आहे. तसेच गंभीर स्वरूपातील गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि टोळीची माहिती घेऊन ही कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!