---Advertisement---

लाडकी बहिणींना मोठा दिलासा : ‘या’ महिन्याच्या हफ्ता जमा होण्यास सुरुवात !

By team
On: February 24, 2026 2:49 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा ₹1,500 चा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक क्रेडिटचे संदेश येऊ लागले आहेत. महिला व बालविकास विभागानेही हप्त्याचे वितरण अधिकृतपणे सुरू झाल्याची माहिती दिली आहे.

जानेवारीचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 18 फेब्रुवारी रोजी महिला व बालविकास विभागाकडे सुमारे 98 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला होता. निधी प्राप्त होताच सोमवारपासून प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील हप्ता नेमका कधी वितरित होणार याबाबत सरकारकडून अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही.

दरम्यान, डिसेंबर 2025 चा हप्ता जानेवारी महिन्याच्या मध्यात वितरित करण्यात आला होता. त्या वेळी सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली होती. मात्र ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्यानंतर लाभार्थींच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे.

ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली तेव्हा तब्बल 2 कोटी 46 लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यानंतर शासनाने 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यापैकी सुमारे 1 कोटी 90 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र कागदपत्रांतील त्रुटी, चुकीची माहिती किंवा पर्याय निवडण्यात झालेल्या चुका यामुळे सुमारे 1 कोटी 60 लाख पात्र महिलांनाच डिसेंबरचा हप्ता मिळू शकला.

अनेक महिलांनी ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने सुधारणा करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. चुकीचा पर्याय निवडलेल्या किंवा माहिती अपूर्ण असलेल्या लाभार्थी महिलांना या कालावधीत दुरुस्तीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जुलै 2024 पासून जानेवारी 2026 पर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 19 हप्ते वितरित करण्यात आले असून, राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे शासनाचे मत आहे. पुढील टप्प्यात अधिकाधिक पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून पडताळणी आणि सुधारणा मोहीम वेगाने राबवली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!