मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या १० दिवसांपासून चांदीच्या भावात सुरू असलेली वाढ कायम राहात शनिवारी (२४ ऑगस्ट) पुन्हा एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन चांदी ८६ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. गेल्या महिन्यात २४ जुलै रोजी ८४ हजारांवर असलेल्या चांदीच्या भावात मध्यंतरी घसरण झाली होती. नंतर मात्र महिनाभरानंतर चांदी पुन्हा ८४ हजार २०० रुपयांवर पोहोचली आहे.
दुसरीकडे सोन्याच्या भावात ३०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर २३ जुलैपासून सोने चांदीचे भाव कमी झाले. ऑगस्टच्या सुरुवातीपासून त्यात पुन्हा भाववाढ सुरू झाली. गेल्या १० दिवसांपासून तर चांदीचे भाव सतत वाढत आहेत. १४ ऑगस्ट रोजी ८२ हजारांवर असलेल्या चांदीचे भाव ८६ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.