मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्याची चर्चा असतांना आता या हत्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीच्या हाती मोठं यश मिळालं आहे. या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीनपैकी 2 आरोपींना पकडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते. आता या 3 पैकी 2 आरोपींना पकडल्याची माहिती समोर येत आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सिद्धार्थ सोनावणे आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याचे बोललं जात आहे. आता पोलीस या दोघांना कधी अटक करणार, त्यांना कोर्टात कधी हजर केले जाणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार होते. सीआयडीकडून त्यांचा कसून शोध सुरु होता. सीआयडीचे वेगवेगळे पथक मुंबई, पुणे यांसह ठिकठिकाणी शोध घेत होते. अखेर आता यातील सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धार्थ सोनावणे यानेच सरपंच संतोष देशमुख यांची टीप दिली होती, असा आरोप त्याच्यावर आहे. आता लवकरच बीड पोलीस अधिक्षक एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत पोलीस याबद्दलची सविस्तर माहिती देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.