---Advertisement---

भाजपवर थेट विश्वासघाताचा आरोप; अजित पवार गट स्वबळावर मैदानात

By team
On: December 27, 2025 3:50 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीतील अंतर्गत तणाव आता उघडपणे समोर आला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर थेट विश्वासघाताचा गंभीर आरोप करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

“भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,” असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत सातत्याने बैठका आणि चर्चा सुरू होत्या. मात्र प्रत्यक्ष जागावाटपाच्या टप्प्यावर भाजपने एकही जागा न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा स्पष्ट निर्णय घेतल्याचे मुळीक यांनी जाहीर केले.

मुळीक म्हणाले, “महायुतीच्या नावाखाली आम्ही युतीधर्म पाळत चर्चांमध्ये सहभागी झालो. मात्र प्रत्यक्षात भाजपने आश्वासनांवर पाणी फेरले. जो पक्ष आपल्या सहकाऱ्यांशी प्रामाणिक राहत नाही, तो मतदारांशीही कधीच प्रामाणिक राहू शकत नाही.” युती फक्त कागदावर होती, प्रत्यक्षात आम्हाला पूर्णपणे डावलण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. भाजपवर आणखी गंभीर आरोप करत मुळीक म्हणाले की, “आमच्या पक्षाची ताकद नसती तर भाजपने आमचे उमेदवार फोडण्याचे प्रयत्न केले नसते. आमचे उमेदवार पळवले गेले, ही बाबच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवते.” एखादा पक्ष युती करत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस थांबणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, वसई-विरारमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. ठाकरे गटाकडून इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटपाची घोषणा करण्यात आली असून आज सुमारे 100 उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे गटही स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसे यांच्यात संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू होती. मात्र सध्याच्या घडामोडींमुळे त्या चर्चांवरही अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागावाटपाची बोलणी पूर्ण झाल्याचे समजते आणि हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. या सर्व घडामोडींमुळे वसई-विरार महानगरपालिका निवडणूक आता बहुपक्षीय, तिरंगी किंवा चौथ्या आघाड्यांच्या लढतीकडे वळण्याची शक्यता बळावली असून आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!