‘संभाजीनगरचा डॉन’ म्हणत तरुण फरार; कोयता विद्यार्थ्याच्या दप्तरात टाकल्याचा प्रकार सीसीटीव्हीत !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

शहरातील मुकुंदवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक व गंभीर घटना उघडकीस आली आहे. भररस्त्यात एका तरुणाने खिशातून कोयता काढून त्याची धार तपासली आणि कोणतीही भीती न बाळगता तो कोयता थेट एका शाळकरी विद्यार्थ्याच्या दप्तरात टाकल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

घटना सीसीटीव्हीत चित्रीत होत असल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणाने “मी संभाजीनगरचा डॉन आहे” असे म्हणत घटनास्थळावरून पळ काढल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी तत्काळ दखल घेत संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली.

व्हायरल व्हिडिओमध्ये अंदाजे २० वर्षांचा एक तरुण मुकुंदवाडीतील एका चिंचोळ्या गल्लीत उभा असल्याचे दिसते. तो आपल्या खिशातून मोठा कोयता काढून तो सोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाकडे देत त्याची धार तपासण्यास सांगतो. त्याच वेळी शाळेचा गणवेश परिधान केलेली काही मुले त्या रस्त्याने जात असतात. त्यातील एका विद्यार्थ्याला इशारा करून दप्तर उघडण्यास सांगण्यात येते. विद्यार्थी दप्तर उघडताच संबंधित तरुणाने कोयता थेट त्याच्या दप्तरात टाकल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसून येते.

या घटनेतून पोलिस तपासणी टाळण्यासाठी सराईत गुन्हेगारांकडून शाळकरी मुलांचा गैरवापर केला जात असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. शाळेच्या गणवेशातील मुलांवर सहसा कुणालाही संशय येत नसल्याने शस्त्रे, कोयते तसेच नशेच्या पदार्थांची वाहतूक करण्यासाठी त्यांच्या दप्तरांचा वापर होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकारामुळे मुकुंदवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment