---Advertisement---

सोन्या-चांदीत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; गुंतवणूकदार हादरले

By team
On: February 6, 2026 11:19 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून, शुक्रवारी सकाळी व्यवहार सुरू होताच कमोडिटी बाजारात खळबळ उडाली. Multi Commodity Exchange of India (MCX) वर चांदीच्या दरात तब्बल 15 हजार रुपये प्रति किलोची घसरण नोंदवण्यात आली. चांदीचा भाव घसरून 2 लाख 29 हजार 872 रुपयांवर पोहोचला असून, सुमारे 6 टक्क्यांचे लोअर सर्किट लागले आहे.

दरम्यान, सोन्याच्याही किमतीत घट झाली आहे. MCX वर सोन्याच्या दरात सुमारे 0.8 टक्क्यांची घसरण झाली असून 10 ग्रॅम सोनं 1 लाख 50 हजार 675 रुपयांवर व्यवहार करत आहे. काही दिवसांपूर्वीच सोन्या-चांदीने विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र आता त्या पातळीवरून दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी पडझड झाली आहे.

एप्रिल 2026 एक्सपायरीचा गोल्ड फ्युचर्स करार आधीच आपल्या उच्चांकी स्तरापेक्षा जवळपास 28 हजार रुपयांनी खाली आला आहे. त्याचप्रमाणे चांदीही आपल्या ‘ऑल टाइम हाय’ पासून सुमारे दीड लाख रुपयांहून अधिक स्वस्त झाली आहे.

बाजारतज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीतील घसरणीचं मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची चिन्हं आहेत. दोन्ही देशांमध्ये अणुकरारासंदर्भात पुन्हा चर्चा सुरू झाल्यामुळे जागतिक बाजारातील अनिश्चितता काहीशी कमी झाली आहे.

याचा थेट परिणाम डॉलरवर झाला असून डॉलर मजबूत झाल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीऐवजी डॉलरकडे वळताना दिसत आहेत. परिणामी मौल्यवान धातूंच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मागील काही आठवड्यांत सोन्या-चांदीत मोठी तेजी आली होती. आता ही तेजी ओसरत असून भाव हळूहळू खाली येत आहेत. काही तज्ज्ञांनी पुढील काळात किमती आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी अस्थिरता असून, पुढील काही दिवसांत जागतिक घडामोडी आणि डॉलरची हालचाल यावरच दरांची दिशा ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!