मुंबई : वृत्तसंस्था
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ऐतिहासिक अॅक्शन चित्रपट ‘छावा’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित करत 30 दिवसांत 554 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकी कौशलच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावत असून, अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकत आपले स्थान मजबूत केले आहे.
शनिवारी ‘छावा’ने 8 कोटी रुपयांची कमाई करत रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ला मागे टाकले. हिंदी आवृत्तीने 7.35 कोटी, तर डब केलेल्या तेलुगू आवृत्तीने 0.65 कोटींची भर घातली. एकूण मिळकत हिंदीतून 541.55 कोटी आणि तेलुगूतून 13.2 कोटी मिळून 554.75 कोटींवर पोहोचली आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ने 553.87 कोटी रुपयांची कमाई केली होती, जी ‘छावा’ने ओलांडली आहे. याशिवाय, 2023 मध्ये शाहरुख खानच्या ‘पठाण’ने 543.09 कोटी कमावले होते, तो विक्रमही ‘छावा’ने मोडला.
येत्या काही आठवड्यांत सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट प्रदर्शित होणार असून, ‘छावा’ला नव्या स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. मात्र, अजूनही ‘छावा’च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तो देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे.
‘छावा’मध्ये विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंह, दिव्या दत्ता आणि डायना पेंटी यांच्या भूमिका आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि उत्तम दिग्दर्शनामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. पुढील काही आठवडे त्याच्या कमाईचा आलेख उंचावत राहील, असे अंदाज वर्तवले जात आहेत.