मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.१३ रोजी बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. एकही आरोपी सुटता कामा नये अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत. तसेच कुठलीही दयामाया कोणाला दाखवू नका, असेही देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. धनंजय देशमुख यांच्या टाकीवर चढून केलेल्या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या एसपींशी संपर्क केला असल्याचे बोलले जात आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण संपूर्णपणे ढवळून निघाले आहे. त्यात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. आरोपींना काठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांशी संपर्क करत एकही आरोपी सुटता कामा नये तसेच कोणावरही दयामाया दाखवू नका, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याला आज केज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केज न्यायालयाने विष्णू चाटेची दोन दिवसांच्या सीआयडी कोठडीत रवानगी केली होती. त्याची सीआयडी कोठडी संपल्याने त्याला आज केज कोर्टात हजर करण्यात आले होते. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
तसेच धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मीक कराडवरही खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असून त्याची कोठडी उद्या संपणार आहे. त्यामुळे उद्या दुपारी त्याला केज न्यायालयात हजर केले जाईल. वाल्मीक कराडला पुन्हा किती दिवसांची कोठडी मिळते, हे पहावे लागणार आहे.