---Advertisement---

पार्थ पवारांना ‘क्लीन चीट’ बातम्या खोट्या : अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप !

By team
On: February 17, 2026 5:00 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांना कथित क्लीन चीट मिळाल्याच्या बातम्यांवर तीव्र प्रतिक्रिया देत त्या पूर्णपणे खोट्या असल्याचा आरोप केला आहे. अजून कोणताही अधिकृत अहवाल जाहीर झालेला नसताना अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांतून कशा काय पसरवल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत बोलताना दमानिया म्हणाल्या की, “खारगे समितीला असा निकाल देण्याचा अधिकारच नाही. ही माहिती संबंधित गटाकडून जाणीवपूर्वक बाहेर सोडली गेली असावी.” पार्थ पवार यांची प्रतिमा सुधारून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची मोहीम राबवली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या पोकळीचा काही नेते फायदा घेत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. त्यांच्या मते, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे भाजपची ‘बी टीम’ म्हणून काम करत असून पक्षाची सूत्रे स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा संपूर्ण प्रकार नियोजनबद्ध असल्याचा आरोप त्यांनी केला.

दमानिया यांनी ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल येथे नियमांचे उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याचा आरोप केला. “दररोज मला यासंबंधी व्हिडिओ मिळतात,” असा दावा करत त्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. व्हीआरएस कंपनीवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता, मात्र तसे झाले नाही, असेही त्या म्हणाल्या. विमान अपघात प्रकरणातील ब्लॅक बॉक्समधील माहिती का पुनर्प्राप्त होत नाही, असा सवाल करत त्यांनी प्रशासनातील ढिसाळपणा आणि राजकीय हस्तक्षेपामुळे अहवाल बाहेर येण्यास विलंब होत असल्याची शंका व्यक्त केली.

दमानिया यांनी कुटुंबीय भूमिकेवर भाष्य करत, “जर काहींवर नाराजी व्यक्त केली जाते, तर पार्थ पवार यांच्यावर का नाही? तो मुलगा आहे म्हणून त्याला वाचवले जाते का?” असा प्रश्न उपस्थित केला. मंत्रालयात प्रत्येक कामासाठी दर ठरलेले असल्याचा आरोप करत विविध ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

दमानिया यांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. क्लीन चीटच्या बातम्या, पक्षातील अंतर्गत हालचाली, प्रशासनातील कथित अनियमितता आणि विमान अपघात तपास यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आगामी काळात राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!