ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या ; भाजपा वगळता सर्वच प्रमुख पक्षांची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी निवडणुक आयोगाची टीम राज्यात दाखल झाली असून राज्यात लोकसभा निवडणूक चार टप्प्यांत घेतल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर होणारा परिणाम आणि मतदारांमधील नैराश्य टाळण्यासाठी विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या, अशी मागणी भाजपा वगळता राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी केली आहे.

मतदानाच्या दिवसापूर्वी अथवा त्यानंतर सरकारी अथवा खासगी आस्थापनांकडून दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांना सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. सलग सुट्ट्यांमुळे मतदार गावी अथवा कुटुंबासह सहलीला जात असल्यामुळे त्याचा मतदानावर परिणाम होत असल्याकडे या पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अनेक तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे अनेक सूचना मांडल्या. लोकसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये झाली. तेव्हा वातावरणात उष्णता होती. राज्यातील विधानसभा निवडणुकासुद्धा नोव्हेंबरमध्येच होण्याची शक्यता असल्यामुळे मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांसाठी शेड, पंखे, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली. मोबाईल व बॅग घेऊन जाण्यास बंदी घालण्यात येते. काही जण मतदार केंद्रावर जाणे टाळतात. त्यामुळे बॅग ठेवण्यासाठी टोकन सुविधा असावी. दीड हजार मतदारांमागे एक बूथ अशी रचनापद्धत बंद करून कमी मतदारसंख्येचा बूथ असावा. तसेच एमएमआरडीए, मेट्रो आणि अन्य प्रकल्पांमध्ये स्थलांतरित झालेल्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणी शेलार यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी पिपाणी निवडणूक चिन्हाबाबत खंत व्यक्त केली. ते म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला तुतारी वाजविणारा मनुष्य असे निवडणूक चिन्ह दिले आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत या चिन्हाशी साम्य असलेले पिपाणी हे निवडणूक चिन्ह अनेक जणांना देण्यात आले. याचा आमच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतावर परिणाम झाला. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती केली असता त्यांनी पिपाणी हे निवडणूक चिन्ह बाद केले आहे. मात्र, राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हे चिन्ह कायम ठेवले आहे. सदरचे चिन्ह तातडीने बाद करावे, तसेच समाज माध्यमावरून चुकीच्या माहितीचा अधिकार घेत समोरच्या उमेदवाराविरोधात खोडसाळ प्रचार केला जातो. अशा प्रकारचा खोडसाळ प्रचार समाज माध्यमावरून निवडणूक आयोगाने तातडीने हटवावा, अशी मागणी रवींद्र पवार यांनी केली.

शिंदे सेनेप्रमाणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची मागणी केली. तसेच सोशल मीडियाच्या आड अपप्रचार करणाऱ्यांवर कारवाई आणि झेंडे, पोस्टर्स लावल्याप्रकरणी खातरजमा करून उमेदवारांवर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाचे आमदार शिवाजीराव गर्जे आणि मंत्री अनिल पाटील यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सर्व मतदारांच्या सुखसोयींना प्राधान्य दिले पाहिजे. याशिवाय निवडणुका शक्य तितक्या कमी टप्प्यांत घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!