मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, पुढील निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे माने यांनी स्वतः सांगितले आहे. यामुळे भाजपला सोलापूरसारख्या भागात नवीन ताकद मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. मात्र, विधानसभा निवडणुकीत परिस्थिती उलट झाली. महायुतीने २३२ जागा जिंकून सत्ता कायम ठेवली, तर महाविकास आघाडी अवघ्या ५० जागांवर अडकली. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला, ज्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मोठा फटका बसला.
निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीमधून महायुतीकडे नेत्यांचा मोठा ओघ सुरू झाला. विशेषतः शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते भाजप आणि शिंदे गटात गेले, ज्यामुळे ठाकरे गट कमकुवत झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटालाही याचा फटका बसला, पण आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. सोलापूरमधील प्रभावशाली नेते आणि माजी आमदार दिलीप माने हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रभावी नेते दिलीप माने हे ओळखले जातात. त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून सुरू झाला असला तरी मध्यंतरी इतर पक्षांत गेले आणि २०२४ मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते. आता मात्र, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. माने यांनी स्वतः सांगितले, परवा आम्हाला निरोप आला की, मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला वेळ दिली आहे. सायंकाळी सात-साडेसातला या, असा निरोप होता. त्यानुसार आम्ही भेट घेतली आणि पुढील निवडणुकांबाबत चर्चा केली.