ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पाकिस्तानचा अजेंडा भारतात चालवण्याचा काँग्रेसचा उद्योग ; अमित शाह

जालना : वृत्तसंस्था

सर्व भ्रष्ट लोकांनी एकत्र येऊन तयार केलेली आघाडी म्हणजे ‘इंडिया’ आघाडी आहे. या आघाडीला दुर्दैवाने सत्ता मिळाली तर त्यांचा पंतप्रधान कोण होणार, देश काय कंपनीप्रमाणे चालवणार काय, असा सवाल करून भाजप नेते अमित शाह यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या प्रत्येक धाडसी कामगिरीवर राहुल गांधी आक्षेप घेत असल्याने पाकिस्तान राहुल यांचे समर्थन करतो. या समर्थनावरून काँग्रेस पाकिस्तानचा अजेंडा भारतात चालवण्याचा उद्योग करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब पा. दानवे यांच्या प्रचारार्थ बुधवारी अमित शाह यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी उपस्थित जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री अतुल सावे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अमित शाह म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या निवडणुका देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून दोन्ही बाजूने लढाई होत आहे. या लढाईचा विजय जनतेला ठरवायचा आहे. एकीकडे सर्व घोटाळेबाजांनी एकत्र येऊन जी इंडिया आघाडी तयार केली, या आघाडीच्या नेत्यांकडे आणि त्यांच्या माणसांकडे कोट्यवधी रुपयांची माया सापडली. त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षांत देश कुणाच्या हातात सोपवायचा आहे, याचा फैसला जनतेने आपल्या मतांतून करायचा आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याचे चित्र बदलणार असून हा प्रांत उद्योगाचे मॅग्नेट होणार आहे. पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळवून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी रावसाहेबांना विक्रमी मतदान करून लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!