---Advertisement---

दादांच्या नेत्याचा दावा :  अन अजित पवार मुख्यमंत्री होणार !

By team
On: June 21, 2025 3:27 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापासून राज्यातील अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या नेहमीच चर्चा सुरु असतांना आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या वर्षभरात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. पुढील वर्षभरात पांडुरंगाच्या मर्जीने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील, असे ते म्हणालेत. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात नवे काय घडणार? असा प्रश्न चर्चिला जात आहे.

आमदार अमोल मिटकरी आज विठ्ठल – रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढच्या वर्षी आषाढीची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना मिळावा असे साकडे आपण पांडुरंगाला घातले असे स्पष्ट केले. त्यावर पत्रकारांनी त्यांना राज्याच्या राजकारणात असा कोणता चमत्कार होणार की? अजित पवार मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करतील? असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी थेट पांडुरंगाच्या मर्जीने राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीला येतील, असे सांगितले.

मी अजित पवारांचा एक भक्त आहे. माझ्या नेत्याने मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी असे मला वाटले. त्यामुळे मी आज देवाला त्याचे साकडे घातले. असे साकडे अनेकजण घालतात. काहीजण पाऊस, पाणी भरपूर पडू दे, शेती चांगली पिकू दे असे साकडे घालतात. त्याच पद्धतीने मी माझ्या नेत्यासाठी देवाला साकडे घातले, असे अमोल मिटकरी म्हणाले. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांच्या पत्नी खासदारा सुनेत्रा पवार यांनीही नुकतीच अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्यावर भाष्य केले होते. पण त्यांनी हा प्रश्न देवावर सोडला होता. अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची पूजा करतील, अशी अनेकांची भावना आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते?, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्यावर आपण कायमच चांगली इच्छा करत असतो. पण शेवटी काय द्यायचे आणि काय नाही द्यायचे, हा देवाचा प्रश्न असतो. पांडुरंग नक्की सर्वांच्या मनोकामना ऐकतील, अशी मला आशा आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या.

विशेष म्हणजे अजित पवारांनीही आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधी लपवून ठेवली नाही. त्यांनी वेळोवेळी त्यांनी आपली ही इच्छा बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीने महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला विराजमान व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. हा धागा पकडत अजित पवार म्हणाले होते, राही भिडे म्हणाल्या की भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसे वाटत असते. पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटते की, मी मुख्यमंत्री व्हावे. पण कुठे जमतंय, असे ते हसत – हसत म्हणाले होते.

तत्पूर्वी, भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून सर्वांनाच आश्चर्यकारक धक्का दिला होता. त्यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले होते, मला माहिती असते हे (भाजप) मुख्यमंत्रीपद देणार आहेत, तर मी सगळेच आमदार घेऊन तेव्हाच भाजपसोबत गेलो असतो. त्यांच्या या विधानाने तेव्हा चांगलाच हशा पिकला होता.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!