अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
धरणाखालील कोल्हापुरी बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करून येत्या २६ किंवा २७ जानेवारी रोजी नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी व पिण्यासाठी कुरनूर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. रविवारी, मैंदर्गी रोडवरील पाटबंधारे विभागाच्या प्रांगणात २०२४-२५ यावर्षीच्या पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली.
त्यावेळी पाण्याचे नियोजन करण्यात आले. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी बंधाऱ्यात पाणी थांबत नसल्याची तक्रार केली. यावर अधिकाऱ्यांनी उत्तर दिले.कुरनूर धरणात सध्या ८४ टक्के पाणीसाठा आहे.तरीही जानेवारी अखेरीस आणि एप्रिलमध्ये असे दोन टप्प्यात पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.बोरी नदीवरती आठ कोल्हापुरी बंधारे आहेत यातील काही बंधारे लिकेज आहेत,
असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते.त्या बंधार्याची किरकोळ स्वरूपाची दुरुस्ती येत्या चार दिवसात पूर्ण करावी,अशी सूचना आमदार कल्याणशेट्टी यांनी अधिकाऱ्यांना केली व
ती त्यांनी मान्य केली.काही बंधारे काटेरी झुडपात अडकले आहेत. त्याची स्वच्छता करून पाणी सोडण्यात यावे.काही बंधाऱ्यांमध्ये गाळ भरपूर साठला आहे तोही काढून पाणी साठवण करावे.असे केल्यास शेतकऱ्यांसाठी पाणी जास्त काळ टिकेल, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.सिंदखेड बंधारा गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त असल्याने बंधाऱ्याला गळती आहे.तो नव्याने करावा,अशी मागणी विनोद पवार यांनी या बैठकीमध्ये केली.बैठकीला कार्यकारी अभियंता मोहन जाधववर, उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा, बोरीपाटबंधारे शाखेचे अभियंता पृथ्वीराज शेवाळे, पाटबंधारेचे शाखा अभियंता चव्हाण, रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, माजी नगरसेवक महेश हिंडोळे, विनोद मोरे,सुनील बंडगर,नन्नू कोरबू, राहुल काळे, अंबणप्पा भंगे, अरविंद ममनाबाद,प्रकाश पाटील, बालाजी मोरे,रणजित शिंदे आदिंसह बोरी नदीकाठचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाण्याचा वापर काटकसरीने करावा
उजनी धरणातून कुरनूर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. तेही पाणी लवकरच कुरनूर धरणामध्ये येईल. यावर्षी पाण्याची कसलीही चिंता शेतकऱ्यांनी करू नये. पाण्याचे योग्य ते नियोजन केले जाईल.शेतकऱ्यांनी देखील पाण्याचा वापर काटकसरीने
करावा.
-
सचिन कल्याणशेट्टी,आमदार