ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशमुख खून प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही !

बीड : वृत्तसंस्था

राज्याचे राजकारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण  तापले असतांना आता सर्व आरोपींवर कारवाई होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.५ येथे दिली. आष्टी उपसा योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस हस्ते करण्यात आले. यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्‍या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन’ कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला अनावरण, विधिवत पूजन करून तसेच रिमोटद्वारे कळ दाबून बोगदा कामाचा शुभारंभ करण्यात आला.

मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी येत्या वर्षभरात नदीजोड प्रकल्प गतीने सुरू करण्यात येणार आहे. कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्यासाठी २३ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने केवळ ७ टीएमसी पाणी उपलब्ध झाले. पाण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आहे, असे सांगून धस हे लोकप्रिय आमदार आहेत, ते आधुनिक भगिरथ आहेत, अशा शब्दांत धस यांचे कौतुक केले.

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे येथील दुष्काळ भूतकाळ झालेला असेल. संपूर्ण परिसर बागायतदार झालेला असेल. बांधा पर्यंत पाणी ड्रीपने पाणी जाईल, अशा योजनेचे आदेश देण्यात आले आहेत. ५३ टीएमसी पाणी गोदावरी आणि मराठवाडा खोऱ्यात आले, तर मराठवाड्यातील पुढील पिढी दुष्काळ पाहणार नाही. नदी जोड प्रकल्पाचे काम येत्या वर्षभरात सुरू करण्यात येणार आहे. उपसासिंचन योजना सोलरवर करणार आहे. त्यामुळे वीजबचत होण्यास मदत होणार आहे. वीज बिलाचा खर्च शेतकऱ्यांवर पडणार नाही. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!