---Advertisement---

दुखवट्यामुळे जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीस मुदतवाढ !

By team
On: January 30, 2026 10:08 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. यानुसार, यापूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असून, ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दि. १३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. मतदान, मतमोजणी तसेच निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक होते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ नंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे दि. २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाल्यानंतर राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान राज्यात दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून निवडणूक कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार, संबंधित जिल्हाधिकारी दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील. आता दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होईल. दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. तसेच निवडून आलेल्या सदस्यांची नावे दि. ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!