---Advertisement---

“दुनिया दौडनेवालों की है, लेकिन ; अमोल मिटकरी यांचे ट्विट !

By team
On: November 11, 2025 10:32 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करताना अनेकांचे चेहरे बदलले. 17 सदस्यांच्या या नव्या यादीतून आमदार अमोल मिटकरी आणि नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांची नावे वगळण्यात आली, त्यामुळे या दोघांना प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाल्याचे स्पष्ट झाले. या घडामोडीवर अमोल मिटकरी सोशल मीडियावर एक पोस्ट करत, आपल्या शैलीत शायरीतूनच आपली भूमिका मांडली आहे.

गत काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवर बेधडक विधाने करून स्वपक्षाची राजकीय कोंडी करणाऱ्या रूपाली पाटील व आमदार अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. रूपाली पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकरणकर यांच्यावर तिखट हल्ला चढवला होता. तर मिटकरी यांच्या विधानांमुळे सत्ताधारी महायुतीत तणाव निर्माण होताना दिसून येत होता. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांनाही प्रवक्ते पदावरून दूर करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.

अमोल मिटकरींचे ट्विट काय?

प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर अमोल मिटकरींनी सोशल मीडियावर दोन ओळींची एक शायरी पोस्ट करत संयम आणि प्रतीक्षेचा संदेश दिला आहे. “दुनिया दौडनेवालों की है, लेकिन मंजिले सब्र वालों को मिलती है!” या शायरीतून मिटकरींनी थेट काही न बोलता, परिस्थितीला सामोरे जाण्याचा संयमी सूर लावला आहे. धावणाऱ्यांच्या या जगात संयम ठेवणाऱ्यांनाच ध्येय गाठता येते, असा भाव या ओळींमधून स्पष्ट जाणवतो.

अमोल मिटकरी हे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी पार्थ पवार यांच्या प्रकरणातही पक्षाची जोरकसपणे भूमिका मांडली होती. पण त्यांच्या काही टोकाच्या भूमिकांमुळे सत्ताधारी महायुतीत मतभेद निर्माण होण्याची स्थिती येत होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला वेळोवेळी अडचणीत यावे लागले होते. अलीकडेच त्यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या जातपडताळणीची मागणी करणारे ट्विट केलं होतं. पक्षातील नाराजी वाढल्यानंतर त्यांना ते ट्विट डिलीट करावे लागले. त्याआधी पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणात पाठिंबा दर्शवणारे ट्विट केल्यानेही पक्षात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना प्रवक्तेपदापासून तूर्त दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!