दिल्ली : संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी पंतप्रधान लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. सोबतच त्यांनी विरोधीपक्षावर जोरदार टीका केली. काल कॉँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आणि अनेक प्रश्न विचारले होते. राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून मोदी सरकारला गोत्यात उभे केले होते. यावरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काल काही लोकांच्या भाषणानंतर त्यांचे समर्थक अक्षरश: उड्या मारत होते. काही लोक म्हणत होते ये हुई ना बात! ये कह कह के हम, दिल को बहला रहे है… वो अब चल चुके है… वो अब आ रहे है… असं म्हणून काही लोक खूश झाले होते, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी हाणला. देशात केवळ स्थिर सरकार नसून निर्णायक सरकार आहे. राष्ट्रहितासाठी निर्णय घेण्याचं धाडस दाखवणारं सरकार आहे. त्यावर लोकांचा विश्वास असणं स्वाभाविक आहे. देशाला जे हवं ते आम्ही देत राहणार. जगात डिजिटल इंडियाची वाहवा सुरू आहे. भारत हे सगळं कसं करतोय याचा विचार अनेक देश करतायत. भारतानं करोना काळात हजारो कोटींची मदत वेगवेगळ्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवली. शिक्षण, क्रीडा, ऊर्जा, तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात देश प्रगती करतोय. प्रत्येक क्षेत्रात आशेचा किरण दिसतोय. निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोकांना देशाची प्रगती सहन होत नाहीए. प्रगती होतेय हे स्वीकारायलाच ते तयार नाहीत. त्यांना १४० कोटी भारतीयांच्या पुरुषार्थावर विश्वासच नाही. जनतेचा आदेश हे निराशेच्या मागचं कारण आहे. पुन्हा पुन्हा जनता आदेश देतेय. या निराशेच्याही पलीकडं अंतर्मनात काहीतरी खलतंय. २०१४ च्या आधी देशाची अवस्था वाईट झाली होती. ते सगळं चित्र बदललं. त्यामुळं निराशा येणं स्वाभाविक आहे.
आम्ही नऊ वर्षांचा काळ पाहिला आहे. त्यांची दिवाळखोरी पाहिली आहे. विधायक टीकेची जागा सक्तीच्या टीकेने घेतली आहे. त्याच्या आवाजात अनेकांनी आपले स्वर मिसळले आहेत – मिले-तेरा मेरा सूर. यामुळे ते एका समान व्यासपीठावर आले नाहीत, पण या लोकांनी ईडीचे आभार मानले पाहिजे की ईडीनेच या लोकांना एका समान व्यासपीठावर आणले आहे. देशातील मतदार जे करू शकले नाहीत ते ईडीने केले असा देखील टोला त्यांनी लगावला.