मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निकालानंतर पहिल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह बाजूला ठेवून शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता निवडणुकीला सामारे जा, नाहीतर विजेते म्हणून फिरू नका, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेसेनेला दिले.
उद्धवसेनेच्या वतीने ५८ वा वर्धापनदिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरे यांनी लोकसभेचा निकाल व आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेसेनेवर टीका केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शहरी नक्षलवादाच्या टीकेवर बोलताना सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष फोडणे, यंत्रणांचा धाक दाखवून विरोधकांना संपवणे हा शासकीय नक्षलवाद आहे असे प्रत्युत्तर दिले. लोकशाही वाचवण्यासाठी लढणे हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे, असा टोला लगावतानाच माझ्या वडिलांचा फोटो चोरता व स्ट्राइक रेट कसला सांगता, असा सवालही त्यांनी केला