नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील पश्चिम बंगालमध्ये एक भीषण दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. २४ परगना जिल्ह्यात वीटभट्टीच्या चिमणीत बुधवारी १३ डिसेंबर सायंकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. स्फोटामुळं चिमणी कोसळल्याने ३० हून अधिक मजूर मलब्याखाली दबले होते. त्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी तीन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. वीटभट्टीची स्टोव्ह पेटवताना हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेत ४ मजुरांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या २४ परगना जिल्ह्यात एका वीटभट्टीवर ६० मजूर काम करीत होते. बुधवारी दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मजुरांनी वीटभट्टीची चिमणी पेटवायची होती. दरम्यान, काही मजूर चिमणी पेटवण्यासाठी गेले. त्यावेळी अचानक भीषण स्फोट झाला आणि ६० फूट उंचीची चिमणी धाडकन जमीनदोस्त झाली. या घटनेत चिमणीच्या मलब्याखाली मजूर दबले गेले. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर ४ मजुरांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. या घटनेत ३० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.