---Advertisement---

संमेलनाच्या नावाखाली उधळपट्टी : आ.आव्हाड यांची सरकारवर टीका !

By team
On: January 9, 2024 3:30 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यावेळीही विश्व मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना प्रत्येकी 75 हजारांचा खर्चही देण्यात येणार आहे. परंतु, संमेलनाच्या नावाखाली सुरू असलेल्या या उधळपट्टीवर परदेशातील मराठी मंडळींनीही नाराजी व्यक्त केली आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे.

आव्हाड म्हणाले की, विश्व मराठी संमेलनाच्या नावाखाली सरकार जनतेच्या पैशाची उधळपट्टी करतंय. कोणताही निकष न लावता परदेशातील सुखवस्तू भारतीयांना आणि मराठीच्या प्रचार-प्रसारात काडीचाही वाटा नसताना केंवळ नोदणी करून वाट्टेल त्यांना या संमेलनाला येण्यासाठी तब्बल 75 हजार रुपये प्रवासभत्ता दिला जाणार आहे, हे कशासाठी?

आव्हाड पुढे म्हणाले की, एकीकडे राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या 14 हजार 783 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारकडे अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून ‘समूह शाळां’चं टुमणं काढलं जातंय आणि दुसरीकडे ‘मराठी’च्या नावाने करदात्यांच्या खिशात हात घातला जातोय. अनेक मराठी प्रकाशनसंस्था, वृत्तपत्र, मराठी भाषेसाठी कार्यरत असलेल्या संस्था बंद होण्याच्या मार्गावर आहेत. चांगली मराठी नाटकं, सिनेमे पैशाअभावी रखडलेली आहेत, त्यांना मदत करायची सोडून हा उपदव्याप कशासाठी?

ते म्हणाले की, मागच्या वर्षीच्या संमेलनातून मराठीला किती आणि कसा फायदा झाला?आलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली का? परदेशातील भारतीयांना बोलवून मराठी भाषेचा जगात प्रसार झाला का? किती मराठी लोकांनी संमेलनाला हजेरी लावली आणि बहुभाषिक असलेल्या मुंबईच्या एका टोकाला संमेलन भरवून मराठी भाषा कशी वैश्विक झाली, या कुठल्याची प्रश्नांची सरकारने उत्तरं दिलेली नाहीत. या सरकारला फक्त इव्हेंटबाजीत रस आहे. मराठी भाषेशी काहीही देणंघेणं नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!