---Advertisement---

बनावट नोटांचा कारखाना उघडकीस; ५९ लाखांच्या नोटांसह सात अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

By team
On: August 2, 2025 8:58 AM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर  : वृत्तसंस्था

शहरालगत बनावट नोटा तयार करणारा गुप्त कारखाना आणि त्या नोटा बाजारात पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश अहिल्यानगर तालुका पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड अद्याप फरार आहे.

पोलिसांनी ५०० रुपयांच्या बनावट नोटा, ज्याची एकूण किंमत ५९ लाख ५० हजार रुपये, तसेच २ कोटी १६ लाख रुपयांच्या बनावट नोटा तयार करता येतील असा कागद आणि यंत्रसामुग्री जप्त केली आहे. एकूण ८८ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अंबिलवाडी (अहिल्यानगर) येथे दोन व्यक्ती बनावट नोटा घेऊन येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर २७ जुलै रोजी सापळा रचून निखिल गांगर्डे आणि सोमनाथ शिंदे या दोघांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर प्रदीप कापरे, विनोद अरबट, आकाश बनसोडे, मंगेश शिरसाठ, आणि अनिल पवार यांना अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधार अंबादास ससाने मात्र घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगरजवळील वाळुंज परिसरातील तिसगाव शिवारात सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकला. येथून अत्याधुनिक छपाई यंत्र, विशेष प्रकारचा कागद आणि तयार नोटा जप्त करण्यात आल्या. मुख्य आरोपी अंबादास ससाने याला यापूर्वीही बनावट नोटांच्या प्रकरणात शिक्षा झाली होती. हरसूल कारागृहात शिक्षेच्या काळात त्याची ओळख मंगेश शिरसाठ व आकाश बनसोडे यांच्याशी झाली आणि तिथेच बनावट नोटा तयार करून जलद पैसा कमावण्याचा कट रचण्यात आला. याआधी नगर जिल्ह्यातील राहुरी पोलिसांनी सोलापूरमधील टेंभुर्णी येथे बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आणला होता. दोन्ही प्रकरणांत कर्जत तालुक्यातील आरोपींचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या दोन्ही टोळ्यांमध्ये संबंध आहे का, याचा तपास सुरु आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बँक अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जातील. सतत संशयास्पद नोटा आणणाऱ्या ग्राहकांची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे त्यांनी आवाहन केले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!