मुंबई : वृत्तसंस्था
देशात ट्रक चालकांनी केंद्राच्या ‘हिट ॲण्ड रन’ कायद्यातील जाचक तरतुदींविरोधात देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदचा फटका हळूहळू सर्व जीवनावश्यक वस्तू व सेवांना बसत आहे. विशेषतः या संपाचा फटका सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी सेवेलाही बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील बहुतांश आगारांत मंगळवार पुरताच डिझेलचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत इंधन पुरवठा पूर्ववत न झाल्यास एसटीची सेवा पूर्णतः विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणात दोषींना 10 वर्षांचा तुरुंगवास व 7 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीविरोदात देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. राज्यात नवी मुंबई, मुंबई, ठाणे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भासह सर्वच शहरांत आंदोलन सुरू आहे. त्याचा प्रभाव हळूहळू सर्वत्र जाणवू लागला आहे. या आंदोलनामु्ळे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. विशेषतः विदर्भातील काही आगारांमधील एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा मोठा फटका प्रवाशी सेवेला होणार आहे.
एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बहुसंख्य बसगाड्या डिझेलवर धावतात. या बससाठी दररोज सरासरी 11 लाख लिटर डिझेल लागते. त्यामुळे हा डिझेल पुरवठा पूर्ववत न झाल्यास एसटीची सेवा खोळंबण्याची शक्यता आहे. परिणामी, त्याचा फटका लाखो सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची भीती आहे.