ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिंमत असेल तर माझ्याविरोधात लढा : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान !

पुणे : वृत्तसंस्था

दिल्लीच्या निकालावर काही नेत्यांनी संशय घेतल्याने भाजपचे नेते आता त्या नेत्यावर टीकास्त्र सोडत असतांना आता राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांना आवाहन केले. 27 वर्षानंतर दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. दिल्लीच्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले असल्याचे ते म्हणाले.

दिल्लीच्या विधानसभेत भाजपला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. अशातच दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना खुले आव्हान दिले आहे. राहुल गांधी म्हणतात की, कामठी विधानसभेत गडबड झाली आहे. त्यामुळे माझे राहुल गांधी यांना आव्हान आहे की, 2029 ची विधानसभा निवडणूक त्यांनी माझ्या विरोधात लढवावी. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढून जिंकून दाखवेन असे बावनकुळे म्हणाले. आमचे कार्यकर्ते प्रामाणिक आहे. राहुल गांधी जर लढायला तयार झाले, तर मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

बावनकुळे म्हणाले, डबल इंजिन सरकार विकास करू शकते, हे देशाच्या जनतेने स्वीकारले आहे. मोदी यांच्या नेतृत्वात जनतेला विकास दिसत आहे. त्यामुळे देशाच्या 75 टक्के भूभागावर भाजपचे सरकार आहे. दिल्लीतील विजय ऐतिहासिक आहे. काँग्रेस स्वकर्तृत्वाने दिल्लीत हरली आहे. काँग्रेसने जनतेच्या विकासाचा मार्ग निवडला नाही. आता काँग्रेस मतदान यंत्राला दोष देईल. सकाळचे नऊचे महान प्रवक्ते बोलायला सुरुवात करतील, असे म्हणत बावनकुळे यांनी नाव न घेता संजय राऊत यांना टोला लगावला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!