सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोर वाढत असतांना नुकतेच मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरून स्कार्पिओ गाडीतून जात असलेला गोवा बनावटीचा विदेशी दारूचा अवैद्यसाठा कामती पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडला. १० लाख ५० हजार रुपयांची अवैद्य दारू व ५ लाख रुपयांची स्कार्पिओ असा एकुण १५ लाख ५० हजार २०० रुपयांचा माल पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाहन चालकाने दाट झाडीत वाहन सोडून पळ काढला. ही घटना दि. २७ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान टाकळी सिकंदर रोडवर घडली.
याबाबत कामती पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर ( बेगमपूर) गावातुन एक स्कॉर्पिओ जात असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची विदेशी दारूचा अवैध साठा आहे. तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक उदार यांनी घोडेश्वर गावच्या पुढील बाजूस वडदेगाव जाणाऱ्या रोडवर कामती पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा सापळा लावला.
त्या दरम्यान दुपारी चार वाजण्याच्या सुमारास काळ्या काचा असलेले एक स्कॉपीओ वाहन येत असल्याचे पोलिसांना दिसले. सदर वाहनाचा संशय आल्याने स.पो.नि. उदार यांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता वाहनचालकाने वाहनाची गती वाढवून वाहन वडदेगाव मार्गे पळविण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ही फिल्मी स्टाईलने स्कार्पिओचा पाठलाग सुरू केला. पोलीस पाठलाग करत आल्याचे लक्षात आल्यानंतर स्कार्पिओ चालकाने टाकळी सिकंदर महावितरण जवळ गाडी दाट झाडीत लपवून दुसऱ्या एका इसमासह तेथुन पळून गेला. पोलिसांच्या पथकाने गाडी ताब्यात घेऊन पाहिले असता, त्यामध्ये विदेशी बनावटीची १० लाख ५० हजार २०० रुपये किमतीचे १२५ बॉक्स आढळून आले. तसेच स्कार्पिओ गाडी असा एकुण १५ लाख ५० हजार २०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला व या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उपविभागीय अधिकारी संकेत देवळेकर यांनी कामती पोलीस ठाण्यास भेट देऊन केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक केले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर व उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामठी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, पो.हे.कॉ. संतनाथ माने, पो.हे.कॉ. सचिन जाधवर, पो.ना. अमोल नायकोडे, पो.कॉ.अनुप दळवी, चालक पो.कॉ. दादासाहेब पवार यांनी केली.