अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर ; करदात्यांना दिलासा मिळणार का? याकडे लागले अनेकांचे लक्ष
दिल्ली : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत. सकाळी १०.१५ वाजता कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी देतील. सकाळी ११.०० वाजता लोकसभेत बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार, करदात्यांना दिलासा मिळणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
अधिवेशनादरम्यान १४ फेब्रुवारी २०२३ ते १२ मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा १३ मार्चपासून सुरू होणार आहे. देशात काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार? सर्वसामान्यांच्या करात वाढ होणार की त्यांना दिलासा मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.
करदाते, गुंतवणूकदार, शेतकरी यांच्या या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. शिवाय पर्यावरणपूरक योजना घोषित होण्याचीही शक्यता आहे. गृहिणींना आणि नोकरदार महिला वर्गाला मोदी सरकारच्या पेटाऱ्यातून काय मिळणार हे ही पाहावं लागेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज (१ फेब्रुवारी २०२३) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेच्या कधीही निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे आजच्या अर्धसंकल्पात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.
यंदाच्या अर्थसंकल्पात कररचनेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या २.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलत आहे. २.५ लाख ते ५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर लागतो. पण आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलासा मिळण्यासाठी शक्यता आहे. अर्थसंकल्पात 5 लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जाऊ शकते.