नागपूर : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी पाहिली, तर पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री, राज्याचे नापसंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, असा घणाघाती आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यावर रविवारी माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना पुत्रप्रेम आहे. त्यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यांना हे माहीत आहे की, आता आयुष्यभर आपल्या घरातले कोणीही मंत्री होऊ शकत नाही. त्यांनी चोरून मुख्यमंत्रीपद घेतले आणि शिवसैनिकांना सोडून स्वतःच्या मुलाला मंत्री केले. त्याऐवजी एका शिवसैनिकाला मोठे करता आले असते. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले असेल, तर मुलाला मंत्री केले, असे बावनकुळे म्हणाले. महाराष्ट्राच्या लायक व्यक्तींच्या यादीमध्ये क्रमांक एकवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. आपण जर महाराष्ट्रातील लायक नसलेल्यांचे सर्वेक्षण केल्यास उद्धव ठाकरे दिसतील, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
ठाकरे यांची लोकप्रियता शरद पवार आणि काँग्रेससोबत बसून कमी झाली आहे. त्यांना माहीत आहे की, ते या लोकसभा निवडणुकीनंतर घरीच बसणार, असा टोमणाही बावनकुळे यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, शरद पवार आता शेतकऱ्यांबद्दल बोलत आहेत. कृषीमंत्री असताना राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तेव्हा ना हमीभाव मिळायचा, ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळायचा.