मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वडिलांचा गंभीर आरोप; पायलट व विमान ऐनवेळी बदलल्याचा दावा

By team
On: February 11, 2026 5:11 PM
Follow Us:
---Advertisement---

बारामती : वृत्तसंस्था

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी नवा वाद निर्माण झाला असून, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वडिलांनी ही घटना अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अपघाताच्या दिवशी विमानाचा पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आल्याचा दावा शिवकुमार माळी यांनी केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

गत 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण अपघातात अजित पवार, पिंकी माळी यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले असतानाच शिवकुमार माळी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संशय व्यक्त केला.

ते म्हणाले, “अपघाताच्या दिवशी फक्त वैमानिकच नव्हे तर विमानही बदलण्यात आले होते. यापूर्वी पिंकीने चार वेळा अजित पवारांसोबत काळ्या व करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. मात्र त्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वेगळे विमान देण्यात आले. असे का करण्यात आले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे पायलट उशिरा पोहोचला, हा दावा देखील माळी यांनी फेटाळून लावला. “सकाळी 6 वाजता मुंबईत कोणत्या भागात ट्रॅफिक असते?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या स्पष्टीकरणावर शंका व्यक्त केली.आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत काही पुरावे सादर केल्याचे सांगत, “त्यांच्या सारखेच आम्हालाही हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आहे,” असे ते म्हणाले.

पिंकी माळीने अपघाताच्या आदल्या दिवशी फोन करून अजित पवारांसोबत प्रवास करणार असल्याचे सांगितले होते. “बारामतीला पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यावर तुमच्याशी बोलेन. मला खूप काही बोलायचे आहे,” असे तिने सांगितल्याचे शिवकुमार माळी यांनी नमूद केले. मात्र, लँडिंगवेळी झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला.

दुर्घटनेनंतर विमान कंपनीकडून कोणताही संपर्क साधण्यात आला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. “माझे जावई आणि नंतर मी स्वतः बारामतीला जाऊन तिचा मृतदेह आणला. आम्ही गेलो नसतो तर तिचा मृतदेहही आमच्या हाती लागला नसता. वेतन, भत्ते किंवा विम्याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही,” असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे अपघाताच्या चौकशीची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित यंत्रणांनी या दाव्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment