सांगली: वृत्तसंस्था
या लोकसभा निवडणुकीत दोन भाग झाल्याचे दिसत आहे. एका बाजूला राममंदिर बनवणारे, ३७० कलम हटवून देशाला सुरक्षित बनवणारे, आर्थिक स्थैर्य निर्माण करणारे आहेत, तर दुसऱ्या बाजूला राममंदिराला विरोध करणारे, व्होट फॉर जिहाद म्हणणारे, स्वतःच्या परिवाराचे कल्याण करणारे लोक आहेत. राहुल गांधी यांची न टिकणारी चायनीज गॅरंटी आहे, तर नरेंद्र मोदींची मजबूत भारतीय गॅरंटी आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ते सांगली येथे प्रचारसभेत बोलत होते.
अमित शाह यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढाच वाचून दाखवला. ते म्हणाले, तुमचे एक मत हे देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवेल. काश्मीर आणि देशाला अधिक सुरक्षित करेल. करोडो गरीब नागरिकांना मदत होऊन त्यांचा जीवनस्तर उंचावेल.
पाचशे वर्षांनंतर देशात श्रीरामाचे मंदिर उभे राहिले.
काँग्रेसने मंदिर निर्माणमध्ये अनेक अडचणी आणल्या. वर्षानुवर्षे कोर्टात केस अडकवली. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर केस मिटवली. मंदिराची पायाभरणी केली, भव्य राममंदिर उभे राहिले, मात्र राममंदिराच्या उद्घाटनावर ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला, यातून त्यांची मानसिकता दिसून येते. मनमोहन सिंग सरकारच्या काळात पाकिस्तानातून अनेक अतिरेकी येऊन अतिरेकी कारवाया आपल्या देशात होत होत्या, मात्र मोदी सरकार आले आणि पुलवामा आणि उरीच्या हल्लेखोरांना धडा शिकवत सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला उत्तर दिले, ही मोदीची गॅरंटी आहे.