बीड : वृत्तसंस्था
राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असतांना सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच मनोज जरांगे मराठा समाजासाठी देव, पंकजा आणि धनंजय मुंडेंनी आरक्षणावर बोलू नये असे म्हणत बीडमधील महाविकस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी मुंडे बहीण भावावर निशाणा साधला आहे. तसेच दोन्ही बहीण भावाला पराभवाची घाई झाली आहे.
त्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहेत असेही ते म्हणालेत. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर जाहीर सभेतून मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
बहीण भावाला पराभवाची घाई या टीकेला बजरंग सोनवणे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ”दोन्ही बहीण भावाला पराभवाची घाई झाली आहे. त्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहेत. त्यांनी टीका करण्यापेक्षा विकासावर बोलावे. धनंजय मुंडे यांना अहंकार झाला असून राज्यातील सर्व पक्ष मीच चालवतो असे त्यांना वाटत आहे. आम्ही कोणत्याही निवडणुकीत कधी जात आणली नाही. तेच जातीचा मुद्दा उपस्थित करत आहेत” असा आरोप देखील बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
पुढे त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी मी देखील मराठा आरक्षणासाठी जिल्हा परिषदेत ठराव घेतला होता असे विधान केले होते. मात्र 2007 मध्ये बीडच्या जिल्हा परिषदेमध्ये मराठा आरक्षणाचा जो ठराव झाला होता, त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव कुठेही नाही आणि त्यांची या ठरावावर सही देखील नाही असे बजरंग सोनवणे यांनी म्हंटले आहे. पुढे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी देव आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणावर बोलू नये असा इशारा देखील बजरंग सोनवणे यांनी दिला आहे.