ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एका दिवसात सोन्याचे दर वाढले !

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील व्यापारयुद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता, देशांतर्गत ठेवींचे घटलेले दर यामुळे हमखास गुंतवणूक देणार्‍या सोन्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.10) शुद्ध सोन्याचे दहा ग्रॅमचे भाव 2 हजार 940 रुपयांनी वाढून 93,380 रुपयांवर गेले.

अमेरिकेने छेडलेल्या व्यापारयुद्धामुळे जागतिक व्यापारातील अनिश्चितता वाढली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अमेरिकन शुल्कवाढीमुळे निर्माण झालेल्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी रेपो दरात पाव टक्का कपात केली. आरबीआयने फेब्रुवारी महिन्यात तब्बल पाच वर्षांनी रेपोदरात पाव टक्का कपात केली होती.

सलग दोनदा रेपो दरात कपात केल्याने बँक ठेवींच्या व्याजदरात अर्धा टक्का कपात झाली आहे. परिणामी, चांगला परतावा देणार्‍या सोन्यामधील गुंतवणुकीत वाढ झाली आहे. लग्नसराईची मागणीही आहेच. या सर्वांचा एकत्रित परिणाम सोन्याच्या भावातील उसळीमध्ये पाहायला मिळाला.

दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. सराफी बाजारात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 2 हजार 700 रुपयांनी वाढून 85 हजार 600 रुपयांवर गेला आहे. चांदीचा एक किलोचा भाव 4 हजार रुपयांनी वाढून 97 हजार रुपयांवर गेला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सराफी बाजारही अस्थिर झाला आहे. अमेरिकेने जाहीर केलेल्या शुल्कवाढीच्या पार्श्वभूमीवर 3 एप्रिलला 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 93 हजारांवर आणि 22 कॅरेटचा दर 85 हजारांवर गेला. त्यानंतर 8 एप्रिलला 24 कॅरेट सोने 89,730 आणि 22 कॅरेट सोने 82,250 रुपयांवर आले. गेल्या दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 3,550 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 3,350 रुपयांनी वाढला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group