---Advertisement---

सरकार काढणार कुणबी नोंदीची श्वेतपत्रिका ; मंत्री पाटलांचे विधान !

By team
On: September 12, 2025 10:08 AM
Follow Us:
---Advertisement---

सांगली : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमकपणे भूमिका नेहमीच घेत असतांना आता राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्याआधारे 10 लाख प्रमाणपत्रे दिली आहेत. सरकार पारदर्शकपणे काम करत आहे. कोणालाही काही शंका असल्यास कुणबी नोंदीची श्वेतपत्रिकाही सरकार काढेल, असे स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

कुणबी नोंदीसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी होत आहे, यासंदर्भातील प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात आतापर्यंत 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्याआधारे 10 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. त्याची सर्व माहिती संगणकांमध्ये आहे. श्वेतपत्रिका म्हणजे काय तर.. संगणकातून आकडे घ्यायचे आणि ते देऊन टाकायचे! त्यामुळे काही अडचण नाही.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या हिताची काळजी केली. त्यातून निघालेल्या शासन निर्णयातून आपल्या समाजावर काही अन्याय होणार नाही, हे पाहण्याचे काम छगन भुजबळ करत आहेत. भुजबळ यांचे जे गैरसमज आहेत, ते दूर करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळत आहे. भुजबळ यांचे समाधान होईल, तसे त्यांचा आक्रमकपणाही कमी होईल. खरेतर सर्व नेत्यांनी मिळून सर्व समाजाचे हित पाहिले पाहिजे. पण प्रत्येकजण आपल्या समाजाचा विचार करायला लागला आहे. त्यातून सामाजिक एकोप्याची वीण विस्कटू लागली आहे. हे दुर्दैवी आहे, पण त्यांनी आपल्या समाजाच्या हिताकडे पाहणे यात चुकीचे काहीच नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेना उबाठाचे नेते उध्दव ठाकरे व मनसेचे नेते राज ठाकरे हे दोन ठाकरे एकत्र येत आहेत. हे दोन ठाकरे म्हणजे दोन पक्ष एकत्र येत आहेत. दोन राजकीय पक्ष एकत्र येणे, हे महाराष्ट्राला नवीन नाही. याची सुरुवात शरद पवार यांनी 1978 मध्ये केली होती. ते काँग्रेसमधून बाहेर पडून अन्य पक्षांच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. नंतर राज्य, देशात असे सारखेच चालू राहिले. त्यात नवे काही नाही.सांगलीत भाजपमध्ये गटबाजी वाढली असल्याच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, नेत्यांची समजूत घालावी, इतपत इथे काही झालेले नाही. पक्षातील नेत्यांमध्ये गटबाजी, वाद वगैरे काही नाही.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!