---Advertisement---

हृदयद्रावक: शेतकरी दांपत्यानी शेतातच संपविले आयुष्य ; गावात शोककळा !

By team
On: July 25, 2025 10:55 AM
Follow Us:
---Advertisement---

बुलढाणा : वृत्तसंस्था

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही अत्यंत गंभीर आणि काळजीची बाब बनली असून, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील भरोसा गावात शेतकरी गणेश थुट्टे (वय ५५) आणि त्यांची पत्नी रंजना थुट्टे (वय ५०) यांनी आपल्या शेतातील निंबाच्या झाडाला दोरी लावून गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाची एकाच झाडाला शेजारी-शेजारी लटकलेली अवस्था पाहून गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

या दाम्पत्याने आत्महत्या का केली, हे स्पष्ट होऊ शकलेले नसले तरी शेतीतील सततचे नुकसान, हुमणी अळीने पिकांचे नुकसान आणि आर्थिक संकट या पार्श्वभूमीवर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटना समजताच अंढेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह झाडावरून उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवले असून, अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, कर्जमाफी त्वरीत घोषित करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना अमलात आणावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह विविध शेतकरी संघटनांकडून होत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!