---Advertisement---

मुसळधार पावसाने माजविला राज्यात हाहाकार : ९  जणांचा मृत्यू !

By team
On: June 16, 2025 3:30 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरु असतांना आता मुसळधार पावसासह विजेच्या कडकडाटाने राज्यभर हाहाकार माजला आहे. शनिवारी (14 जून 2025) वीज पडून 9 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीररीत्या भाजले गेले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांसह चार जणांचा समावेश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे ढगफुटीसदृश पावसाने पूरस्थिती निर्माण झाली, तर अहिल्यानगर येथील सीना धरण 40 वर्षांत प्रथमच जूनमध्येच पूर्ण भरले आहे. हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी केला असून, मुंबईसाठी यलो अलर्ट कायम आहे.

शनिवारी राज्यभरात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. या नैसर्गिक आपत्तीमुळे 9 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीररीत्या भाजले गेले. यश राजू काकडे (14, रा. सारोळा) आणि रोहित राजू काकडे (21, रा. सारोळा) हे दोन सख्खे भाऊ शेतात काम करत असताना वीज पडून मृत्यूमुखी पडले. रंजना बापूराव शिंदे (50, रा. मोंढा बु.) घराजवळ वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर शिवराज सतीश गव्हाणे (31, रा. पिंपळदरी) यांच्यावर शेतात काम करताना वीज पडली.

याशिवाय, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 7 जण गंभीररीत्या भाजले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणी येथील पिंप्राळा येथे माणिक महादराव मिरासे (47) यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर धुळे येथील ताजापुरी येथे नथ्थू हरचंद सनेर (63) यांचा मृत्यू झाला

जळगाव येथील मोहित जगतसिंग पाटील (25, रा. खेडगाव नंदीचे, ता. पाचोरा), शांताराम शंकर कठोरे (44, रा. पूर्णाड, ता. मुक्ताईनगर) तर अमरावती तुरखेड येथील पवन कोल्हे (25) यांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात शुक्रवारी रात्री (13 जून 2025) ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. यामुळे नद्यांना पूर आला, आणि तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला. प्रसिद्ध आडिवरे येथील श्रीदेवी महाकाली मंदिराच्या आवारात तब्बल 37 वर्षांनंतर प्रथमच पुराचे पाणी शिरले, ज्यामुळे स्थानिकांमध्ये चिंता पसरली. पूरस्थितीमुळे रस्ते, शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाने पूरग्रस्तांना मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!