---Advertisement---

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : कृषीमंत्री म्हणाले कर्जवसुली थांबवलीच पाहिजे !

By team
On: September 24, 2025 3:34 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासन गंभीरतेने याचा आढावा घेत आहे. ज्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी कर्जवसुली थांबवलीच पाहिजे. त्याबाबत राज्य सरकार बँकांना स्पष्ट सूचना देणार आहे, अशी माहिती बुधवारी (दि.२४) राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ते म्हणाले की, जालना जिल्ह्यात तब्बल २ लाख ५४ हजार एकर क्षेत्र पिकांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्हा सर्वाधिक नुकसानग्रस्त असून, अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वत्र पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी स्वतः शेतावर जाऊन तपासणी करत आहेत. शेतकऱ्यांना कोणतेही फोटो काढून देण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्य सरकारने नुकसानीसाठी मदतीची प्रक्रिया गतीमान असून मंगळवारी (दि.२३) शासनाकडून २२१५ कोटी रुपये निधी जमा करण्यात आला आहे. दरम्यान अजूनही आकडेवारी वाढत आहे. त्या प्रमाणात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल. दिवाळीपूर्वी कोणतीही मदत थांबणार नाही, प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळेल, असे आश्वासन भरणे यांनी यावेळी दिले. या

यावेळी त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः शेतकरी बांधवांची भेट घेऊन परिस्थितीचा थेट आढावा घेत आहेत. पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांवरील कर्जवसुली थांबवण्याच्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार असून, पंचनाम्यांनंतरची मदत थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे या संकट काळात शेतकरी एकटे नाहीत, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असेही मंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!