मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महाविकास आघाडीत बिघाडीची स्थिती दिसत असतांना आता महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसमधील बड्या नेत्यांऐवजी नवख्या नेत्याकडे हे पद सोपवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीबाबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा मलाही आश्चर्य वाटले. कारण त्यांचे नाव चर्चेतही नव्हते. मला वाटले होते, कोल्हापूरचे सतेज पाटील या पदावर येतील, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर कॉंग्रेसने पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचा विचार केला. प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख या मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षाने बड्या चेहऱ्यांना डावलून सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. याबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी या मागणी इनसाइड स्टोरी सांगितली.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव चर्चेत नव्हतेच. कारण ते महाराष्ट्रातील सीनियर नेते नाहीत. त्यांनी राहुल गांधींसोबत काम केले आहे, काँग्रेसशी ते निष्ठावान राहिले, हे सगळे खरे आहे. पण, त्याचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत नव्हते. महाराष्ट्रात पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. परंतु, मी माझ्या ऐवजी कुठल्या तरुण नेत्याला संधी मिळाली, असे पक्ष नेतृत्वाला कळवले होते. माझ्या अपेक्षेप्रमाणे सतेज पाटील यांचे नाव पुढे समोर यायला हवे होते. आम्ही सतेज पाटील यांचे नाव पक्षश्रेष्ठींना कळवले होते. कदाचित ते तसे आले देखील असेल. मात्र, सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद पद स्वीकारण्यास नकार दिला असावा. वरिष्ठ नेत्यांनी नकार दिल्यानंतर पक्षाला दुसरा विचार करावा लागला असेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ चांगले काम करतील. परंतु, काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असतानाच त्यांना महाविकास आघाडीमधील पक्षांशी समन्वय ठेवावा लागणार आहे. यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. जर प्रस्थापित नेत्यांनी हे पद घेण्यास नकार दिला असेल तर पक्षासमोर फारसा पर्याय उरलेला नाही. आमच्यासाठी आता हा विषय संपला आहे. आता हर्षवर्धन सपकाळ पुढे कसे काम करतात, हे आपण पाहू, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.