---Advertisement---

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देता येणार नाही !

By team
On: May 5, 2025 4:29 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

महायुतीच्या मंत्र्यांमध्ये आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या असतांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे अर्थसहाय्य 2100 रुपयांपर्यंत वाढवता येणे शक्य नाही. या प्रकरणी आपल्याला वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल, अशी कबुली राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे लाडकी बहीण योजनेच्या मुद्यावर महायुती सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पाय छाटून पळ म्हणणे बरोबर नाही, असेही शिरसाट यावेळी निधी वाटपावरून अजित पवारांवर निशाणा साधताना म्हणाले.

विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे अनुदान 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा मोठा लाभ सरकारला निवडणुकीत झाला. पण आता सरकार आपल्या या आश्वासनावरून मागे फिरताना दिसत आहे. कारण, महायुती सरकार सत्तेत येऊन 6 महिने लोटले तरी या दिशेने अद्याप कोणतेही ठोस पाऊल टाकण्यात आले नाही. उलट या योजनेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार या विभागाचा निधी त्या विभागाला वर्ग करताना दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी उपरोक्त दावा केला आहे. ते सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सरकारने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण सध्याची स्थिती पाहता असे करणे शक्य नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. प्रस्तुत योजनेविषयी माझ्याकडे फेब्रुवारी महिन्यात एक फाईल आली होती. त्यावर मी स्पष्टपणे पैसे देता येणार नाही असे लिहिले होते. या योजनेचे सरकारवर बर्डन आले आहे. अजित पवार जाणिवपू्र्वक आमच्या खात्याचा निधी वर्ग करत असतील असे मला वाटत नाही. पण त्यांना गाईड करणारे सेक्रेटरी त्यांना चुकीचे ब्रिफिंग करत असतील.

राज्याचे बजेट अडीच लाख कोटींचे आहे. त्यानुसार माझ्या खात्याला 11.8 टक्के म्हणजे 29,500 कोटींचा निधी मिळण्याची गरज आहे. पण आम्हाला केवळ 22,600 कोटींचा निधी मिळाला. उर्वरित निधी येणे अद्याप बाकी आहे. यामुळे माझ्या खात्याला विविध योजना चालवण्यात अडचणी येत आहेत. माझ्या खात्याचा सहानुभूतीपूर्वक विचार झाला पाहिजे. मी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली आहे. तसेच या प्रकरणी अजित पवारांशीही चर्चा केली आहे, असे ते म्हणाले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!