ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मोठी अपडेट !

मुंबई  : प्रतिनिधी

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असून, यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. ३२ जिल्हा परिषद (ZP) व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीच्या प्रक्रेला सुरुवात करण्यात आली आहे. आयोगाने यासाठी कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध केला असून, मतदार यादीवरील हरकती व सूचना ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सादर करता येणार आहेत.

१ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक म्हणून आयोगाने निश्चित केला आहे. या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर नागरिकांना मतदार यादीत दुरुस्त्या, नावांची नोंदणी किंवा वगळण्यासंदर्भात हरकती व सूचना १४ ऑक्टोबरपर्यंत सादर करता येणार आहेत.

२७ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. यासोबतच मतदान केंद्रनिहाय यादी देखील प्रकाशित केली जाणार आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजेच मतदार यादी संकलन व सुधारणा यशस्वीरीत्या पार पडण्याची शक्यता आहे.

 

🔹 ८ ऑक्टोबर २०२५ – प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

🔹 ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ – हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत

🔹 २७ ऑक्टोबर २०२५ – अंतिम मतदार यादी जाहीर

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३० जानेवारी २०२६ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे झेडपी व पंचायत समित्यांच्या निवडणुका नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरमध्ये पार पडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतरच महानगरपालिका निवडणुकांची घोषणा आणि मतदार यादी प्रक्रियेची तयारी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, अनेक पक्षांनी आपल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही आठवडे राज्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!