नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील तरुण तरुणीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 12 मार्च ते 10 एप्रिलदरम्यान www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमॅन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि महिला लष्करी पोलिसांच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. तसेच, हवालदार एज्युकेशन, हवालदार सर्वेयर ऑटोमेटेड कार्टोग्राफर, JCO कॅटरिंग आणि JCO रिलिजियस टीचर पदांसाठीही भरती जाहीर करण्यात आली आहे.
दोन पदांसाठी एकच अर्ज
यंदाच्या भरती प्रक्रियेत एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता अर्जदारांना एकाच अर्जामध्ये दोन पदांसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि तरुणांना अधिक संधी मिळेल.
भरती शुल्क आणि अर्ज भरताना महत्त्वाचे नियम
अग्निवीर भरतीसाठी अर्ज शुल्क फक्त 250 रुपये असून, ते ऑनलाइन जमा करावे लागेल. अर्ज भरताना 10वीच्या गुणपत्रिकेच्या आधारे पालकांचे नाव भरावे लागेल. तसेच, मूळ रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाइल) आवश्यक असेल.
धावण्याच्या नियमांत शिथीलता
यंदा धावण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पूर्वी 1600 मीटर धावण्याची दोन गटांमध्ये विभागणी होती, मात्र यंदा चार गट करण्यात आले आहेत. यामुळे अधिक उमेदवारांना संधी मिळणार आहे.
नवीन धावण्याचे निकष आणि गुणांकन
- 5 मिनिटे 30 सेकंदात धाव पूर्ण केल्यास 60 गुण
- 5 मिनिटे 31 सेकंद ते 5 मिनिटे 45 सेकंदात धाव पूर्ण केल्यास 48 गुण
- 5 मिनिटे 46 सेकंद ते 6 मिनिटांत धाव पूर्ण केल्यास 36 गुण
- 6 मिनिटे 1 सेकंद ते 6 मिनिटे 15 सेकंदात धाव पूर्ण केल्यास 24 गुण
शारीरिक पात्रता आणि उंची निकष
- अग्निवीर GD, टेक्निकल, ट्रेडसमॅन (8वी व 10वी पास) – उंची 170 सेमी, छाती 77 सेमी (82 सेमी फुगवून)
- अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल – उंची 162 सेमी, छाती 77 सेमी (82 सेमी फुगवून)
शैक्षणिक पात्रता
- अग्निवीर GD – 10वी उत्तीर्ण, किमान 45% गुण आणि प्रत्येक विषयात 33% गुण आवश्यक
- अग्निवीर टेक्निकल – 12वी उत्तीर्ण, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजीमध्ये 50% गुण, प्रत्येक विषयात किमान 40 टक्के गुण
- अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल – 12वी उत्तीर्ण, एकूण 60 टक्के गुण, इंग्रजी आणि गणित/अकाउंट्समध्ये 50 टक्के गुण आवश्यक
- अग्निवीर ट्रेडसमॅन (10वी पास) – सर्व विषयांमध्ये किमान 33 टक्के गुण
- अग्निवीर ट्रेडसमॅन (8वी पास) – सर्व विषयांमध्ये किमान 33 टक्के गुण
- महिला लष्करी पोलीस – 10वी उत्तीर्ण, 45 टक्के गुण आणि प्रत्येक विषयात 33 टक्के गुण आवश्यक
लिखित परीक्षा आणि पुढील प्रक्रिया
अग्निवीर भरतीची लिखित परीक्षा जून महिन्यात अपेक्षित आहे. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक www.joinindianarmy.nic.in वर प्रसिद्ध केले जाणार आहे.
महत्त्वाची हेल्पलाइन
अर्ज प्रक्रियेसंदर्भात कोणताही प्रश्न असल्यास 7518900195 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नमुना प्रश्नपत्रिकांद्वारे संगणक आधारित परीक्षेचा सराव करू शकतात. अग्निवीर भरतीसाठी सुवर्णसंधी – इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा!