मारुती बावडे
अक्कलकोट : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा चिंतातूर होता. खरिपाच्या पेरणी नंतर पाठ फिरविलेल्या पावसाने २७ जून रोजी ११ वाजता आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
अक्कलकोट तालुक्यात आजवर २० टक्के खरिपाच्या पेरणी झालेल्या आहेत. तालुक्याच्या पूर्वेकडे समाधानकारक पाऊस झाल्याने मूग, उडीद, तूर, सोयाबीन अशी खरिपाच्या पिकांची पेरणी झाली आहे. तर पूर्वेकडील भाग वगळता तालुक्यात कोठेही खरिपाची पेरणी झाली नाही त्यामुळे मृग नक्षत्र निघाल्यापासून खरिपाच्या पेरणीसाठी पुरेसा मान्सून बरसावा म्हणून अगदी चातकासारखी वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना रविवारी पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून पेरणीपूर्वी मशागत करून तयार केलेल्या शेतात खरिपाच्या पेरणीसाठी हा आर्द्रा नक्षत्राचा पाऊस उपयुक्त समजला जात आहे.
मान्सून पूर्व व मान्सूनच्या पावसाने अक्कलकोट तालुक्यात वागदरी बोरगाव, घोळसगांव, बादोले, किणी, पालापूर, शिरवळ, कुरनुर, साफळा परिसरातील गावांमध्ये काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली होती आणि त्यावर खरिपाची पेरणी केली होती. सध्या शेतकरी मोठा पाऊस पडावा म्हणून मोठ्या आशाने आकाशाकडे डोळे लावून बसले होते.
आकाशात अधूनमधून काळेकुट्ट ढग जमा होत होते. परंतु पाऊस मात्र हुलकावणी देत होता. रविवारी सकाळी ११ वाजता तालुक्यात सर्वदूर चांगली व दमदार हजेरी लावल्याने सकल भागात व शेतात पाणी साचले आहे. यंदाच्या वर्षातील आज पडलेल्या पावसाने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.










