मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या अनेक दिवसापासून मोठे पक्ष प्रवेश सुरु असतांना आता सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ठाकरे गटाला सोडत शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसेच भास्कर जाधव यांची सोशल मीडियावरील पोस्ट देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसंच काय जनावरं सुद्धा विश्वास ठेवतात’, असे स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवले होते. यानंतर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी जाधव यांना थेट ऑफर दिली आहे.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले, भास्कर जाधव यांच्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. त्यांचा म्होरक्या धाडसी नाही, अशी भास्कर जाधव यांची मानसिकता झाली आहे. किती सत्यता आहे. स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या माणसावर आरोप केल्यावर कसे सहन करणार. जाधव तिथे राहणार नाहीत. भासकार जाधव यांनी एकदा एखादा निर्णय घेतला की ते मागे हटत नाहीत. त्यामुळे येत्या महिनाभरात मोठे बदल होतील, असे संजय शिरसाट यांनी म्हंटले आहे.
पुढे बोलताना संजय शिरसाट यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील भाष्य केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडकी बहीण योजनेसह सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांना भाजपचे सदस्य बनवून घ्या, असे आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना केले होते. यावर संजय शिरसाट म्हणाले, ही योजना सर्वसामान्य बहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. याचा वापर महिलांना पक्षात घेण्यासाठी करु नका, असे करणे गैर आहे. ही योजना सरकारची आहे. सरकार योजनेच्या माध्यमातून कोणतेही उपकार करत नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे. एका हाताने घेऊन दुसऱ्या हाताने घेऊ नये. भाजपचे हे वागणे चुकीचे आहे.
संजय शिरसाट यांनी पुढे बोलताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर देखील भाष्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिकतेच्या आधारे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा की नाही, हे धनंजय मुंडे यांनी ठरवावे असे म्हंटले होते. यावर संजय शिरसाट म्हणाले, पक्षात दोन भूमिका घेऊन चालत नाहीत. कुणाला काढायचे त्याचे अधिकार अजित पवारांना आहेत. पक्षाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे.