मुंबई वृत्तसंस्था : भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात आक्रमक प्रचार सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक टीका केली. “एकनाथ शिंदे यांच्या मागे सध्या राहू किंवा शनिदोष आहे का, याची खात्री त्यांनी एखाद्या ज्योतिषाकडून करून घ्यावी. राहू-केतू त्यांना शांतपणे जगू देतील का, अशी शंका वाटते,” असा टोला वडेट्टीवारांनी लगावला.
नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवारांनी मुंबईतील वंचित बहुजन आघाडीसोबतच्या आघाडीच्या चर्चांवरही भाष्य केले. वंचितने मुंबईत काँग्रेसकडे ६० जागांची मागणी केल्याच्या चर्चांवर ते म्हणाले, “वंचितने नेमक्या कोणत्या जागांवर दावा केला आहे, याची मला सध्या माहिती नाही. मुंबईतील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतरच स्पष्ट चित्र समोर येईल. उमेदवारी अर्ज भरण्यास अजून दोन दिवस शिल्लक आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत तोडगा काढला जाईल.”
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या चर्चांबाबत विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, “दुसऱ्यांच्या घरात काय चालले आहे, याकडे पाहण्याचा मला अधिकार नाही. मात्र त्यांच्या चर्चा बर्याच पुढे गेल्याचे ऐकतोय. घड्याळ की तुतारी, यावरच वाद सुरू आहे. शरद पवार अजित पवारांसोबत जात असतील तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, ही भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे.” भाजपचा ठाण्यातील जोरदार प्रचार, संभाव्य आघाड्यांच्या चर्चा आणि नेत्यांच्या टीकाटिप्पणींमुळे आगामी महापालिका निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.






