मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक पवित्रा घेत असतांना आता अंतरवालीत पुन्हा उपोषण करणार नाही असंही त्यांनी जाहीर केले होते. आता मात्र, येत्या 15 फेब्रुवारीपासून पुन्हा साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाचा निर्णय देखील येत्या दोन दिवसात घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीसांवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस फक्त चाल टाकणारा माणूस आहे. तू इतका बेईमान होऊ नको. मला आणि मराठ्यांना हलक्यात घेऊ नको. रडायची वेळ आली होती. आम्हाला चॅलेंज देऊ नको. वेळ पडली तर चार कोटी मराठे रस्त्यावर येतील. खोटं बोलून आमचं उपोषण उठवलं. आम्ही तुला मानलं होतं की आमच्याशी गद्दारी करणार नाही. तुझ्यावर खूप विश्वास होता, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला.
पुढे बोलताना म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आमच्या लेकरांनी आत्महत्या केल्या. तुझ्या मुलीसाठी तू बंगल्यावर जात नाही. सरकारपेक्षा मराठा मोठा आहे. हे पुन्हा एकदा दाखवून देऊ. माझ्याशी गद्दारी करु नको. एकही मराठा आमदार म्हणू शकत नाही की आम्हाला मराठ्यांनी मतदान केले नाही, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.