सोलापूर : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई शंकर अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला.
आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे, असे मागणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी मागितले.
आषाढी सोहळा आज बुधवारी (दि. १७) भक्तिमय वातावरणात व प्रचंड उत्साहात साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. संतांच्या पालख्या मंगळवारीच सायंकाळी तीर्थक्षेत्र पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. सध्या पंढरीत सुमारे २० लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त एसटी, रेल्वे, खासगी वाहनांसह पालख्या-दिंड्यांच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.