ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुलीशी प्रेमसंबध : तरुणाला मरेपर्यत बेदम मारहाण !

बीड : वृत्तसंस्था

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना आता एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आपल्या ट्रकवर चालक म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणाने आपल्याच मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याचा मालकाला संशय होता. त्यावरून मालकासह अन्य संशयितांनी चालकाला घरात दाेन दिवस बांधून ठेवत दाेरी आणि वायरने अमानुष मारहाण केली गेली. त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्या कुटुंबीयांना तातडीने येण्याचा निरोप देत त्याचा तरुणाचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात बेवारस टाकून आरोपींनी पळ काढला. ही घटना आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथे शनिवारी घडली. याप्रकरणी १० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विकास अण्णा बनसोडे (२३, रा. बोरगाव, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. पिंपरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक असून तो ऊस वाहतुकीसाठी ते कारखान्याला देतात. या ट्रकवर विकास बनसोडे हा चालक म्हणून २०१८ पासून कार्यरत होता. ताे पिंपरी येथेच वास्तव्यास होता. आपल्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा संशय आल्याने क्षीरसागर यांनी त्याला कामावरून काढून टाकले होते. २० फेब्रुवारी रोजी तो आपल्या गावी बोरगाव येथे गेला होता. दरम्यान, १२ मार्च रोजी तो पुन्हा मित्र प्रकाश साळवे (रा.रजाळा, ता. भोकरदन) याच्यासह पिंपरी येथे आला होता. शनिवारी तो भाऊसाहेब यांच्या घराकडे मुलीला भेटण्यासाठी गेल्यानंतर भाऊसाहेब क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबीयांनी विकास व प्रकाश या दोघांनाही घरासमोरच्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवून बेल्ट, दोरी आणि वायरने बेदम मारहाण केली. यात विकास याचा मृत्यू झाला तर प्रकाश याने पळ काढला. याप्रकरणी आष्टी पोलिसांत आकाश बनसोडे याच्या तक्रारीवरून १० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुलाच्या मृत्यूनंतर कडा आरोग्य केंद्र व आष्टी पोलिस ठाणे परिसरात त्याच्या नातेवाइकांनी आक्रोश केला. आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा द्या म्हणत वडील अण्णा बनसोडे व आईने टाहो फोडला होता.

विकास याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी कडा आरोग्य केंद्रात तयारी केली गेली होती. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी आष्टी तालुक्यात उत्तरीय तपासणी करण्यास नकार दिला. यंत्रणेवर अविश्वास दाखवून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला.

विकासचा मृत्यू झाल्याचे कळताच भाऊसाहेब व त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचा मृतदेह कारमध्ये कडा आरोग्य केंद्रात नेला. तिथे डॉक्टरांना काहीही माहिती न देता सर्वांनी तिथून पळ काढला. डॉक्टरांनी तपासून पाहिले असता तो मृतावस्थेत होता. भाऊसाहेब क्षीरसागर, बाबासाहेब क्षीरसागर, स्वाती क्षीरसागर, सुवर्णा क्षीरसागर, संकेत क्षीरसागर, संभाजी झांबरे, सचिन भवर, सुशांत शिंदे, बापूराव शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद झाला. भाऊसाहेब, स्वाती आणि सुवर्णा यांना ताब्यात घेतले आहे.

शनिवारी दुपारी भाऊसाहेब याने विकास याच्या भावाला फोन करून तुम्ही इथे तातडीने या, असे सांगितले. काय झाले आहे विचारल्यानंतर ‘इथे आल्यानंतर सांगतो’ एवढेच उत्तर दिले. संशय आल्याने त्याच्या आईनेही त्यांना मारू नका, अशी विनंती फोनवरून केली होती. यानंतर विकासच्या भावाने प्रकाश याला फोन केला असता त्याने बंाधून ठेवून मारहाण केली जात आहे. तुम्ही आल्यावरच हे लोक आम्हाला सोडतील, असे सांगितले. त्यानंतर त्याचे कुटुंबीय आष्टीला आले. विकासचे कुटुंबीय पिंपरी येथे पाेहोचले. त्यांनी मुलाबाबत विचारणा केली असता त्याला कडा रुग्णालयात नेले असून त्याच्या पोटात दुखत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कडा रुग्णालयात पोहोचलेल्या कुटुंबीयांना विकासचा मृतदेहच दिसला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!