धाराशिव : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना आता एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे प्रेमसंबंधांची किंमत एका तरुणाला जीव गमवून चुकवावी लागली. भूम तालुक्यातील दुधोडी गावातील माऊली बाबासाहेब गिरी याला प्रेमसंबंधातून झालेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली. रविवारी (दि.१६) त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, माऊली गिरीचे आणि पांढरेवाडी येथील विवाहित तरुणीचे प्रेमसंबंध होते. ३ मार्च रोजी व्हॉट्सअॅपवर झालेल्या संभाषणामुळे हा प्रकार मुलीच्या पतीला कळला. संतापलेल्या पतीने माऊली याला भेटण्यासाठी पांढरेवाडी येथे बोलावले. तेथे मुलीच्या पतीसह तिचे वडील आणि इतर ४-५ जणांनी त्याला विवस्त्र करून लोखंडी रॉड आणि काठ्यांनी अमानुष मारहाण केली. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्याला रस्त्यालगत फेकून दिले.
गंभीर जखमी अवस्थेत माऊली याला प्रथम जामखेड, नंतर सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. १४ दिवसांच्या उपचारांनंतर रविवारी सकाळी १०:३० वाजता त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.