---Advertisement---

मराठा समाजाने घातली लग्नासाठी आचारसंहिता ; नियमावली जाहीर !

By team
On: June 2, 2025 10:55 AM
Follow Us:
---Advertisement---

अहिल्यानगर : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यातील पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या घटनेनंतर समाजमन हादरले असून, तिच्या मृत्यूने केवळ तिच्या कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख केले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर लग्नातील हुंडा, मानपान आणि शाही सोहळ्यांच्या प्रथांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील मराठा समाजाने एक अत्यंत स्वागतार्ह आणि पुरोगामी पाऊल उचलत मोठा निर्णय घेत समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे.

अहिल्यानगरमध्ये नुकतीच मराठा समाजाच्या विचारमंचाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समाजातील हुंडा आणि बडेजावाच्या विवाह प्रथांविरोधात ठोस निर्णय घेण्यात आला. या बैठकीत एक आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार विवाह साध्या पद्धतीने पार पाडावा, हुंडा किंवा मानपान घेणे-देणे टाळावे, विवाह सोहळा विनाखर्ची व सुसंस्कृत ठेवावा यांसह प्री-वेडिंग शूट आणि अनावश्यक खर्च न करण्याचे नियम या आचारसंहितेत करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ही आचारसंहिता फक्त भाषणापुरती न राहता प्रत्यक्षात उतरावी, यासाठी 11 सदस्यांची सुकाणू समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असणार आहे. या आचारसंहितेचे पालन करणाऱ्या पालकांचा समाजातर्फे सत्कार देखील करण्यात येणार आहे.

मराठा समाजाच्या लग्न समारंभासाठी आचारसंहिता खालीलप्रमाणे…

  • लग्न सोहळा (100/200) मर्यादित लोकात केला जावा.
  • प्री-वेडिंग प्रकार बंद करावा. केलाच तर तो लग्न सोहळ्यात जाहीर दाखवू नये.
  • कसल्याही परिस्थितीत लग्न वेळेवरच लावावे.
  • लग्नात डीजे नको.पारंपरिक वाद्य, लोक कलावंतांना संधी द्या.
  • कर्ज काढून लग्नात खर्च करू नये. मराठा समाजात लग्नाच्या कर्जामुळेच अनेक आत्महत्या झालेल्या आहेत.
  • नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा.
  • हार घालताना नवरा नवरीला उचलू नका.
  • लग्नात फक्त वधूपिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत. पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावेत.
  • लग्न, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात, पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपात आहेर करावेत.
  • लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत. देखावा करू नये.
  • लग्नात हुंडा देऊ-घेऊ नये. वडिलांची खूपच इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करावी.
  • लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा.
  • लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा.
  • पैशासाठी सूनेचा छळ करू नये.
  • समाजातील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक मदतीचा हात द्यावा. नुसत्या शुभेच्छा नकोत.
  • जेवणात 5 हून अधिक पदार्थ नकोत.
  • विविध कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या भोजन प्रसंगी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी, सुकी भोजन पाकीट व्यवस्था असावी.
  • दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करा. लग्न आणि दशक्रिया विधीला मान्यवरांचे आशीर्वाद, श्रद्धांजली हा कार्यक्रम बंद करावा. श्रद्धांजलीसाठी गरज वाटल्यास वेगळा विशेष कार्यक्रम घ्यावा.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!