अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
हर हर महादेवचा गजर, आसमंतात फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी, नेत्र दीपक रथोत्सवाने अक्कलकोटमध्ये पाच दिवसांपासून चाललेल्या ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवाची उत्साहात सांगता झाली.शेवटच्या दिवशी झालेल्या रथोत्सव सोहळ्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले.लक्ष लक्ष नयनाने हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.प्रारंभी नंदीध्वजांची प्रदक्षिणा मंदिरास झाली.
विरक्त मठाचे मठाधिपती श्री.म.नि. प्र. बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते पूजन करून रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला. या रथोत्सवाला अनेक वर्षांपासूनची परंपरा
आहे.यामुळे शहरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नंदीध्वजांच्या मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गावर रांगोळ्या आणि पारंपारिक वाद्याने वातावरण अतिशय भक्तीमय बनले होते.या उत्सवात पाच दिवस रोज नंदीध्वजांची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.नंदीकोले, लिंबीतोटे,पाटील, आडवीतोटे, रोडगे हे पाच नंदीध्वजांचे मानकरी आहेत.त्यांना यात्रेत विशेष महत्त्व आहे.दरम्यान सकाळी श्रींना अभिषेक, नैवेद्य, आरती, त्यानंतर दुपारी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य नंदीध्वजाची मिरवणूक निघून सायंकाळी सूर्यास्तावेळी श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ पोहोचली.
नंदीध्वजाचे मानकरी व त्यांच्या सर्व सहकारी व भाविकांना शहरातील विविध मार्गावर विविध ठिकाणी सुगंधी दूध,लाडू, पाणी बॉटल वाटप करण्यात आले.या उत्सवात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले,कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,जेष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी,शिवशरण जोजन,मिलन कल्याणशेट्टी,बसलिंगप्पा खेडगी,आनंद तानवडे,मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी,माजी नगरसेवक
महेश हिंडोळे,राजशेखर हिप्परगी, प्रथमेश इंगळे, मल्लिकार्जुन पाटील,अशपाक बळोरगी, दिलीप सिद्धे, अविनाश मडिखांबे, प्रशांत लोकापुरे, बसवराज माशाळे, राजकुमार नागुरे, स्वामीनाथ हिप्परगी,विलास कोरे,गजानन पाटील, शिवराज स्वामी,दिनेश पटेल,नीलकंठ कापसे, सुनील गोरे आदिंसह हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बाराबंदी पोशाख अन फटाक्यांची आतषबाजी
मिरवणुकीत बाराबंदी, पांढरा पोशाख घातलेले तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ज्यावेळी रथोत्सव होत होता. त्यावेळी आकाशामध्ये प्रचंड विविध रंगांची मुक्तपणे फटाक्यांची आतषबाजी झाली.यामुळे मंदिर परिसर हा भाविकांनी फुलुन गेला होता.